विम्याचे प्रकार थर्ड पार्टी विमा
या प्रकारचा विमा हा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यातील तरतुदी वाहनाच्या नुकसानभरपाईसाठी नसून एखाद्या व्यक्तीस व त्याच्या वाहन अथवा मालमत्तेस वाहनामुळे नुकसान, इजा अथवा जीवितहानी झाल्यास त्याची भरपाई देण्यासाठी आहे. हा विमा न काढल्यास कायद्याच्या दृष्टीने तो गुन्हा ठरू शकतो.
साधारण सर्वसमावेशक विमा योजना
या प्रकारच्या विमा योजनेत अपघात वादळ, भूकंप, आग, पूर, दंगल यामुळे होणारे नुकसान गृहीत धरले जाते. पण गाडीचे टायर, बॅटरी, रबर प्लास्टिक भागांची (पॉलिसी काढल्या दिवसापासूनच) नुकसानभरपाई (५०% उत्पादकाने ठरवलेल्या एमआरपीच्या तुलनेत) मिळते. त्याचप्रमाणे धातू व पत्र्याच्या पार्ट्सवर पहिले सहा महिने घसारा शून्य टक्के असतो. परंतु आता यापेक्षाही अधिक चांगल्या सुविधा देणाऱ्या पॉलिसीज मिळतात त्या पाहू..
शून्य टक्के घसारा
या प्रकारातील विमा योजनेत एखाद्या पादचाऱ्याला गाडीचा धक्का लागलाच त्याला कमीत कमी इजा व्हावी, तसेच गाडीचे वजन कमी करून इंधनाची बचत व्हावी यासाठी आता प्लास्टिक आणि फायबरचे पार्ट्स जास्त वापरले जातात. अपघातप्रसंगी ते पूर्णपणे निकामीही होतात. साधारण विमायोजनेत या पार्ट्सची नुकसानभरपाई ही मूळ किमतीच्या ५०% च मिळते. परंतु शून्य टक्के घसारा प्रकारातील विमा योजना घेतल्यास वर उल्लेख केलेल्या पार्ट्सचीसुद्धा १००% नुकसानभरपाई मिळते. अशा प्रकारच्या विमा योजना गाडी घेतल्यापासूनच पाच वर्षांपर्यंत मिळू शकतात.
कन्झ्युमेबल सेक्युअर
अपघातामुळे गाडीचे इंजिन ऑइल, गिअर ऑइल, ब्रेक आणि पॉवरस्टिअिरगमध्ये वापरले जाणारे हायड्रॉलिक फ्लुइड, वातानुकूलन प्रणालीतील गॅस. रेडिएटरमधील कूलंट, एसी कॉम्प्रेसर, ऑइल, नटबोल्ट स्क्रू, ऑइल फिल्टचर, बेअिरग्ज, क्लिप्स या सर्व गोष्टींची नुकसानभरपाई या प्रकारात मिळू शकते. याबरोबरच इंजिन सेक्युअर आणि टायर सेक्युअर या योजनाही उपलब्ध आहेत.
आणीबाणी प्रसंगी
या पद्धतीच्या सुविधेमध्ये अपघातामुळे गाडी नादुरुस्त झाल्यास विमाधारकाच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी भाडय़ाची गाडी वापरल्यास अथवा अपघातामुळे आपल्याला एखाद्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहावे लागल्यास गाडीचे भाडे अथवा एक दिवसाचे हॉटेलचे बिल विमा कंपनीकडून मिळू शकते. मात्र, त्यासाठी योग्य बिले विमा कंपनीला सादर करणे बंधनकारक आहे. टॅक्सी भाडे किंवा हॉटेलचे पसे याची भरपाई म्हणून मिळणारी रक्कम ही प्रत्येक विमा कंपनीची वेगळी असू शकते.
की रिप्लेसमेंट
नवीन तंत्रज्ञानावर आधारलेल्या गाडय़ांमध्ये आता इग्निशन कीचे स्वरूप बदलत असून त्यामागे इलेक्ट्रॉनिक कोड आणि रिमोटसारख्या गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. अर्थातच त्यामुळे चावी हरवल्यास किंवा तुटल्यास, चोरीला गेल्यास नवीन चावी बनवण्यासाठी आणि स्कॅनरद्वारे त्याचे री-कोिडग करण्यासाठी की रिप्लेसमेंट सुविधेद्वारे नवीन चावी बनवण्याच्या ५०% पर्यंतचा खर्च विमा कंपनीकडून मिळू शकतो.
नो क्लेम बोनस
विमाधारकाने एक वर्षांच्या विमा योजनेच्या निर्धारित वेळेत कोणताही स्वरूपाचा दावा (क्लेम) न केल्यास प्रति वर्षी नो क्लेम बोनस वाढत जातो. तो ५०% पर्यंत वाढू शकतो. गाडी विकते वेळी आपल्या पॉलिसीवरती नोंद केलेला नो क्लेम बोनस आपल्याला आपल्या नवीन गाडीवरती (विमा कंपनी बदलली तरी) वापरता येतो. मात्र जुनी गाडी दुसऱ्या व्यक्तीचे नावे झाल्याचा कागदोपत्री पुरावा विमा कंपनीस / नवीन गाडी घेताना दाखवणे आवश्यक असते. प्रसंगी नो क्लेम बोनस आधीची गाडी विकल्यानंतर पुढील तीन वर्षांपर्यंत (एकदा) वापरता येतो.
पॉलिसी एक्स्प्रेस
कोणत्याही प्रकारच्या गाडीची नुकसानभरपाईचा दावा करताना १५०० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या इंजिन असलेल्या गाडय़ांना रुपये १००० व १५०० सीसीहून अधिक क्षमतेचे इंजिन असलेल्या गाडय़ांना रुपये २००० हे विमाधारकाने भरणे अनिवार्य असते. मिळणाऱ्या विम्याच्या रकमेतून ते वजा केले जातात.
रिटर्न ऑफ इन्व्हॉइस
या प्रकारच्या सुविधेमध्ये गाडीसाठी भरलेला एकरकमी कर आपल्याला विम्याने सुरक्षित करता येतो. एकरकमी कर हा १५ वर्षांसाठी वैध असतो. त्याच्या आकारणीसाठी सरकारी निकष खालीलप्रमाणे..
* पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या गाडीसाठी गाडीच्या मूळ किमतीच्या ९%
* डिझेल इंधनावर चालणाऱ्या गाडीसाठी गाडीच्या मूळ किमतीच्या ११%
* सीएनजी. इंधनावर चालणाऱ्या गाडीसाठी गाडीच्या मूळ किमतीच्या ५%
एखाद्या दुर्दैवी प्रसंगात जसे की खूप मोठा अपघात, वाहनांची चोरी, दंगल किंवा आगीत कार भस्मसात होणे (समाजकंटकांद्वारे उभ्या असणाऱ्या वाहनांना आग लावण्याचे कृत्य सध्या वाढीस लागल्याचे आपण पाहतच आहोत) गाडीचे पूर्ण नुकसान झाल्यास एकरकमी कराची रक्कम भरपाई म्हणून परत मिळते.
No comments:
Post a Comment